Ad will apear here
Next
‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत


रत्नागिरी :
‘कोकनातली लोककला कशी... बगन्यासारी...’ या नाटकातल्या तात्या गावकराच्या डायलॉगची रसिकांना पुरेपूर अनुभूती देऊन सादर झालेल्या ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या नाट्यकृतीने तिवरेवासीयांसाठी लाखभराचा मदतनिधी उभारला. शनिवारी (१३ जुलै) सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या या नाट्यप्रयोगाने आणि ते सादर करण्यामागच्या कलाकारांच्या भावनेनेही रत्नागिरीकरांची मने जिंकली. 

दोन जुलै रोजी रात्री रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याने १३ घरे आणि २३ माणसे वाहून गेली. त्यामुळे भरून न येणारे नुकसान झाले. गेलेली माणसे पुन्हा येऊ शकत नाहीत; पण राहिलेल्या माणसांना उभारी देण्याची गरज आहे. नेमका हाच धागा पकडून ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याची टीम पुढे आली. समर्थकृपा प्रॉडक्शनने या नाटकाची निर्मिती केली आहे. कोकणातील संस्कृती, लोककला, संगमेश्वरी बोली या गोष्टींची कीर्ती या नाटकाने गेल्या दोन वर्षांत राज्यभरात पसरवली. कोकणातील समस्यांवर आणि त्याच्या उपाययोजनांबद्दल या नाटकातून संदेश देण्यात आला आहे. 



त्यामुळेच कोकणातील एका गावावर ओढवलेल्या दुर्धर प्रसंगात आपण त्यांना काही तरी मदत केली पाहिजे, या भावनेने या नाटकाची टीम पुढे आली. त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेनेही मदत केली. तसेच, रत्नागिरीच्या नगर परिषदेनेही नाट्यगृह उपलब्ध करून दिले. दुर्घटना दोन तारखेला रात्री घडली. त्यांच्या मदतीसाठी १३ जुलैला नाट्यप्रयोग करणार असल्याची घोषणा या टीमने अवघ्या चार दिवसांत म्हणजे सहा जुलैला केली. तिकिटाचे मूल्य केवळ १०० रुपये ठेवण्यात आले होते. या आवाहनाला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकाच्या तिकीटविक्रीतून, तसेच लोकांनी त्याव्यतिरिक्त केलेल्या मदतीतून सुमारे एक लाख रुपयांचा निधी गोळा झाला. त्याशिवाय नाट्यगृहात मदतनिधीसाठी बॉक्सही ठेवण्यात आला होता. त्यातही लोकांनी सढळ हस्ताने मदत केली. त्यामुळे निधीचा एकंदर आकडा आणखी मोठा होऊ शकतो.



या नाटकाची मूळ संकल्पना गिरीश बोंद्रे, आनंद बोंद्रे यांची आहे. नाटकातील सूत्रधार तात्या गावकर (सुनील बेंडखळे) यांच्यासह मुख्य प्रभाकर डाऊल, सचिन काळे, योगेश बांडागळे, रवींद्र गोनबरे, पिंट्या चव्हाण, विश्वास सनगरे, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, अनिकेत गोनबरे, राहुल कापडी, राज आणि केतन शिंदे, अभिषेक सावंत अशा सर्वच कलाकारांनी नेहमीप्रमाणेच नाटकात धमाल केली. जाखडी, नमन, गवळण अशा कोकणातल्या पारंपरिक कलाप्रकारांवर रसिकांनी ठेका धरला. मंगेश मोरे (सिंथेसायझर), मंगेश चव्हाण (ढोलकी-पखवाज) आणि अभिषेक भालेकर (तबला) अशा अनेक कलाकारांनी या नाटकाला संगीतसाज चढवला. साजेशी वेशभूषा आणि प्रकाशयोजना यांचाही या नाटकाच्या यशस्वितेत हातभार आहे.

खेकड्यांनी धरण फोडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर आधारित असलेल्या ऐन वेळी घेतलेल्या अॅडिशन्स लोकांच्या टाळ्या घेऊन गेल्या. तसेच, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बंद झालेले रस्त्यालगतचे उद्योग, त्यातून भरपूर पैसे मिळाल्यामुळे नवे काही उद्योग न करण्याची मानसिकता, कोकणातील मुला-मुलींनी आपल्याकडची उद्योगक्षमता न ओळखता बाहेर जाऊन बारीकसारीक नोकऱ्या करणे, मोबाइलच्या साह्याने प्रगती कशी करता येईल हे न पाहता त्यात विनाकारण टाइमपास करणे, आंब्या-काजूच्या पिकांव्यतिरिक्त वेगळा विचार न करणे अशा सगळ्या गोष्टींकडे विनोदातून लक्ष वेधून या नाटकाने रसिकांना अंतर्मुख केले. शिवाय हे नाटक इथल्या मातीतल्या अस्सल संगमेश्वरी बोलीत असल्याने त्यातील आत्मीयता प्रकर्षाने जाणवत होती. नाटक सुरू असताना मध्येच एका पंख्याचे पाते तुटून पडल्याने थोडा गोंधळ झाला; मात्र जेमतेम मिनिट-दोन मिनिटांतच नाटक पुन्हा सुरू झाले.

स्नेहल कारेकर यांचे निवेदन

तिवरे धरणफुटीच्या घटनेची तीव्रता लक्षात येण्यासाठी नाटक सुरू होण्यापूर्वी तीन मिनिटांची व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. निखिल पाडावे आणि विवेक वाडये यांनी ती तयार केली होती. त्यानंतर स्नेहल कारेकर यांनी या दुर्घटनेच्या अनुषंगाने सादर केलेले भावपूर्ण निवेदन हृदयाचा ठाव घेऊन गेले. नाटक विनोदी असले, तरी सुरुवातीच्या सुरुवातीची क्लिप आणि निवेदनाचा प्रभाव नाटक संपेपर्यंत कायम होता. शेवटी, सुनील बेंडखळेंसह सर्व कलाकारांनी रसिकांचे आभार मानले आणि पुढील आठवड्यातच हा मदतनिधी तिवरेवासीयांना देणार असल्याचे जाहीर केले.

कलाकार संवेदनशील असतात. समाजातील सुख-दुःखांचे प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतीत उमटते. किंबहुना अशीच कला लोकांच्या काळजात स्थान मिळविते. ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’च्या टीमकडून या सगळ्या गोष्टींचे प्रत्यंतर आले. 

नाट्यगृहात राहुल कळंबटे यांनी काढलेली रांगोळी

मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्षांसमोर नाटक सादर होणार
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी या प्रयोगाला काही वेळासाठी हजेरी लावली. या नाटकाचा प्रयोग २८ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर करायचा असल्याची माहिती सामंत यांनी दिली, असे परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी नाटकाच्या शेवटी जाहीर केले. या वेळी नाट्य परिषदेच्या आसावरी शेट्ये आणि अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

(‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या नाटकाविषयी सविस्तर वाचण्यासाठी आणि झलक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZQJCC
 The sun gives warmth & light to the world & expects nothing in return, not because it is good or bad, but because it is the Sun's nature...
Life becomes harder for us when we live for the others, and it becomes richer & happier...
Congratulations....
Fly high....2
Similar Posts
‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ लोकनाट्याची द्विशतकपूर्ती; आज ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान रत्नागिरी : अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या अस्सल संगमेश्वरी बोलीतील लोकनाट्याचा द्विशतकपूर्ती सोहळा १४ जानेवारी २०२० रोजी रत्नागिरीत होणार आहे. या निमित्ताने आयोजित प्रयोगादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. या
तिवरेवासीयांच्या मदतीसाठी रत्नागिरीत ‘संगमेश्वरी बाज’चा प्रयोग रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे सर्वस्व वाहून गेले आहे. त्यांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे आले आहेत. मदतनिधी उभारण्यासाठी ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकप्रिय लोकनाट्याचा विशेष प्रयोग १३ जुलैला रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे
तिवरे धरणग्रस्तांसाठी किफायतशीर, मजबूत फेरोसिमेंट घरांबद्दल जिल्हाधिकारी सकारात्मक रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या साह्याने घरे बांधण्याचा प्रस्ताव पुण्याच्या ‘फेरोसिमेंट सोसायटी ऑफ इंडिया’ने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना पाठवला होता
चिपळूणचे वैभवशाली वस्तुसंग्रहालय चिपळूणच्या तब्बल १५५ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले वस्तुसंग्रहालय अलीकडेच खुले केले आहे. चिपळुणातील हे संग्रहालय कोकणाच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव ठरते आहे. भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षांतील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language